Sunday, 25 September 2016

अट्रॅसिटी रद्द किवा बदल सुचविणाऱ्यानी खालील माहिती वाचावी आणि खुशाल ठरवावे आपन किती खरे बोलतो

*_अट्रॅसिटी रद्द किवा बदल सुचविणाऱ्यानी खालील माहिती वाचावी आणि खुशाल ठरवावे आपन किती खरे बोलतो......_*
      
          *दि. 31 ऑगस्ट 2004* रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील नखेगाव येथे चर्मकार माय-लेकींचा क्रूर खून करण्यात आला. 2004 याच वर्षी सप्टेंबर मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हिवरा येथे चर्मकार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला.
            _2006 साली झालेल्या खैरलांजी प्रकरणाने तर अक्खा महाराष्ट्र हादरुन गेला. एवढं भयंकर हत्याकांड की त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली._
_या प्रकरणातील सर्व आरोपींवर राजकीय वरदहस्त होता. आपले कोणीच काही वाकडे करु शकत नाही. माणसे कुत्र्यासारखी मारून फेकून दिली काय ? आणि कोम्बडी सारखी कापली काय.. आपले कोणी काहीच वाकडे करु शकत नाही या हलकट माजातून असले क्रूर हत्याकांड घड़ले._
             2008 ला नांदेड जिल्ह्याच्या सातेगावमध्ये चन्द्रकांत गायकवाड या मातंग तरुणाने आंतरजातीय विवाह केल्याने गावातल्या काही व्यक्तींनी त्याला जबर मारहाण करत त्याचे डोळे काढून टाकले. दमदाटी करणे वैगेरे ठीक होते पण त्याचे डोळे काढ़ून टाकणे हे कोणत्या मानसिकतेतून करण्यात आले असावे ? 
          _2009 साली एका वड़ार मुलाने झाडावरचा आंबा खाल्ला म्हणून त्याच्या नाका तोंडातून रक्त येई पर्यन्त मारले. एवढ्यावर न थांबता हे खुप माजलेत म्हणत त्याच्या घरात घुसून त्याचा बाप आणि आई दोघांना शिविगाळ आणि दमदाटी व मारहाण केली. सदर कुटुंब पोट भरायला आले असल्याने त्यांना या लोकांची मर्दुमकी मुकाट्याने सहन करणे भागच होते. जास्त शहानपणा केला तर गावात पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी दिली होती._
             मार्च 2012 मध्ये नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानभोशी येथे 70 वर्षाच्या विधवा चर्मकार महिलेचा अत्यंत क्रूर खून करण्यात आला. सन 2013 मध्ये सोनई हत्याकांड घडले. मेहतर समाजातील मुलाने आपल्या मुलीसोबत प्रेम केल्यामुळे गावातील प्रतिष्ठित माणसाने मुलाला पाण्याच्या टाकित बुडवून जीवे मारले. एकजण पळून जात असताना त्याला पकडून वैरण कापतात त्या यंत्रामध्ये टाकून त्याचे बारीक-बारीक टुकड़े केले.
वैरण कापन्याच्या यंत्राने माणूस कापण्याचा क्रूरपणा हा फक्त जात द्वेषातून आणि स्वजातीच्या माजातून जन्माला आला होता.
          _अशाच एका प्रेम प्रकरणातून रोहिदासला भर चौकात शंभर-दीडशे लोकांनी पोलिसांसमक्ष सतत पाच तास बेदम मारहाण केली. त्याच्या रक्तबंबाळ शरीरावर मीठ-मिरचीची पूड चोळून त्याला तडफडवले. तो पाणी मागत असताना त्याला गटारातलं पाणी चपलेने पाजले._
         2014 मध्ये अहमद नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा या गावी नितिन आगे या दलित तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. कारण काय तर गावातल्या एका सवर्ण मुलीशी असलेले प्रेम प्रकरण. नितिन आगेला तड़फ़डून, झाडाला बांधून, लोखंडी सळाया घालून त्याचा अतिशय निर्घृण असा खून करण्यात आला. कारण त्याची असलेली खालची जात. जातीय द्वेष एवढा की तो माणूस आहे हेच ते नराधम विसरून गेले.
           _अहमदनगर जिल्हा व तालुक्यातील देउळगांव सिद्धी या गावात 19 जानेवारी 2014 रोजी चर्मकार माय-लेकिंना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. गप्पा मारणारे त्यावेळी कुठे लपून बसले होते...?_
            या सर्व क्रूर हत्या आणि अत्याचारांमध्ये एक महत्वाचा आणि कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे 'जात' ! आमचे कोणीच काही वाकडे करु शकत नाही, आम्ही माणसे कापू, तोडू, फेकून देऊ पण आमच्याकडे असलेली राजकीय पॉवर, पैसा याच्या जोरावर आम्ही या कफल्लक लोकांना हवे तसे पिरगाळू, हवे तसे चिरडून टाकू... या असल्या भयंकर विक्षिप्त मानसिकतेतून ही क्रूर हत्याकांड घडत असतात. सगळेच सवर्ण असे क्रूर नसतातच मुळात. अगदी सगळ्या गावात एक-दोन गावगुंड असला जातीय माज बाळगुन असतात. हे जे आहेत त्याचं काय ? त्यांना कोणी आळा घालायचा ? इथे फेसबुक/व्हाट्सऑपवर तर काही विकृत सर्रास धमक्या देतात. एकदा अट्रोसिटी रद्द होऊ दया यांना आपण रस्त्यात कापू, घरात घुसून फाडू वैगेरे.... म्हणजे बघा किती तीव्र द्वेष भरलाय मनात. मग अशा विकृतांवर जरब बसवणारे कायदे नकोत का ?
            _मागे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात व समाजशास्त्रज्ञ डॉ. घनश्याम शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील ११ राज्यांतील ५६५ गावांची पाहणी केली असता त्यांना अनेक खेड्यांत आजही कशी अस्पृश्यता पाळली जाते, याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. त्यांना ३५ टक्के सरकारी शाळांत दलित विद्यार्थ्यांसाठी पाण्याची वेगळी सोय केल्याचे आढळले. २७.६ टक्के पोलिस स्टेशनात व २५ टक्के सरकारी रेशनिंग दुकानात दलितांना प्रवेश बंदी आहे. ३३ टक्के आरोग्य कर्मचारी दलितांच्या घरी जाण्यास नकार देतात. २३.५ टक्के पोस्ट कर्मचारी दलितांच्या घरी पोस्ट वाटप करीत नाहीत. २९.६ टक्के पंचायत कार्यालयांमध्ये दलितांना वेगळे बसविण्यात येते. १४.४ टक्के खेड्यांत पंचायत समिती भवनात दलितांना प्रवेश नाही. १२ टक्के खेड्यांत दलितांना मतदानासाठी वेगळी रांग आहे. ६४ टक्के गावांत दलितांना हिंदूच्या मंदिरात प्रवेशबंदी आहे. अलीकडेच कोकणातील चिपळूणमधील एका गावात होळीला चर्मकार समाजातील लोकांना गावातील उच्चवर्णीयांनी देवाच्या पालखीला हात लावण्यास मनाई केली. वरील सर्व प्रकरणे म्हणजे दलितांवर रोज घडणारा छुपा अन्याय आहे._
             हे सगळे सांगायचे कारण एकच की आता काही विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार आणि काही संघटना अट्रोसिटी कायदा बंद करा म्हणून ओरडत आहेत. हे लोक किती सहज रित्या बोलून जातात की अट्रोसिटीमुळे अन्याय होतो वैगेरे... पण यांना हे का समजत नाही की जिथे 3 खोट्या अट्रोसिटी निघतात तिथे 3 हजार दलित अत्याचाराच्या, बालात्काराच्या खऱ्या घटना घडलेल्या असतात. आणि अट्रोसिटी जरी झाली तरी शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. महाराष्ट्रात तर निव्वळ 2.9% एवढं प्रमाण आहे. कारण वरील बहुतेक प्रकरणांमध्ये असे आढळते की, या केसमधील फिर्यादी व साक्ष‌िदारांवर मोठ्या प्रमाणात पैसा व दहशतीच्या मार्गाने दबाव आणला जातो. त्यांचे गावातील दैनंदिन जगणे, कामधंदा करण्यास प्रतिबंध करणे आदी दबावतंत्राने व आर्थिक, सामाजिक, राजकीय पाठबळ नसल्याने केसचा पाठपुरावा करणे त्यांना जड जाते. अॅट्रोसिटी केसेसमध्ये पोलिस, डॉक्टर्स व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वर्तन पूर्ण असहकाराचे असते.
_जे लोक सफाई कामगार आहेत, मोलमजूरी करून जगणारे आहेत त्यांना या खोट्या केसेस आणि कोर्टाच्या तारखा खरेच परवडणाऱ्या आहेत का ? त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे का ? जगण्यासाठी धड़पड करणारी माणसे खोटी अट्रोसिटी टाकून त्यात वेळ आणि पैसा घालवायला मोकळी आहेत काय ? याचा विचार काही सुज्ञ लोकांनी करावा._
         सध्या  फेसबुक वर काही पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अट्रोसिटी विरोधात जोरदार मोहीम राबवित आहेत. पण याचवेळी ते वरील घटनांकडे जाणून बुजुन कानाडोळा करत आहेत. ही मंडळी अगदी आरामात बोलून जातात की अट्रोसिटी बंद करा... मग 4-5 कार्टून्स खाली कमेंट मध्ये धिंगाना घालतात पण त्याचवेळी तिकडे दुर्गम भागात 14 एप्रिलला आंबेडकर जयंती होऊ दयायची नाही असा ठराव होतो. झालीच तर दगडफेक करायची. त्याचवेळी तिकडे दूर एका आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढलेली असते. त्याचवेळी एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्या तोंडात गटारीचे पाणी टाकलेले असते. त्याचवेळी तिकडे कुठे तरी दलित महिलेवर बलात्कार होत असतो.
            _सगळ्यात महत्वाचे म्हणजे, ज्यांच्यावर खोटी अट्रोसिटी पडली आहे त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत. ते चांगला वकील आणु शकतात, कोर्टात अपील करु शकतात, सुटू शकतात, माणसा सारखे जगु शकतात. पण त्यांचं काय ? जे या जात अत्याचाराला बळी पडले ???_
           खर्ड्याच्या नितिन आगेला कोणी अपील करु दिली का ?
खैरलांजीच्या प्रियंका भोतमांगेला तिची बाजू मांडू दिली का ? सोनईच्या सचिनला कोणी पुढची तारीख दिली का ? नखेगावच्या मायलेकिना कुणी वाचवले काय ? पानभोशीच्या सरस्वतीबाईला लोखंडी फाळाचे गरम चुटके देवून मारले, तिचा तो आक्रोश कुणीच कसा ऐकला नाही ? गोणारच्या संतोष भालकेचे किती तुकडे केले ते अद्याप का सापडत नाहित ?
अशा एक ना अनेक पीड़ित लोकांना या काही निवडक राजकीय सरंजामांनी एकदा तरी माणुसकी दाखवली का ?? एकदा तरी ईथे भेट दिली काय ? यांनी आजवर कोणत्याही दलितांचे अश्रू पुसले नाहित ! बरेच दलित हे हिंदू आहेत तरी त्यांना जवळ करावे असे यांना का वाटले नाही ?
         _वाईट तर या गोष्टीचे वाटते की आमचेच कांही दलाल या उच्चवर्णीय जातीयवादी लोकांची भाटगिरी करीत आहेत. अट्रासिटी बंद करा म्हणत असतांना राज ठाकरेच्या बाजूलाच बाळा नांदगावकर उभे असतात पण त्यांना त्यावेळी बोलायला तोंडच नसते. आपणही एक दलित चांभार आहोत याचा जणू त्यांना विसरच पडलेला असतो !_

No comments:

Post a Comment