Monday, 24 April 2017

मंदिरासमोर लुटली इज्जत

मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र, कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही...||१||

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस...
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस...
खुप केलं हरी हरी तरी, मुखांत कधी मावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||२||

कधी स्वत: राहून उपाशी,
भुक त्याची भागवली...
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली...
आहार त्याचा वाढतं गेला, कधी एका बक-यावर भागला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||३||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या...
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या...
पाप-पुण्याचा हीशोब कधी, मला त्यानं दावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत मला घावला नाही...||४||

आता म्हणे गांव सोडूनं तो,
ऊंच टेकड्यांवर बसतोय...
बघुनं गयेचा बुध्द त्याला,
गालामध्ये हसतोय...
उघडा-नागडा केला तरी, भीमावर कधी तो कावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||५||

कविता कुनाची आहे हे मला नक्की माहीत नाही...पन त्या लिहणार्याला सलाम.

Sunday, 23 April 2017

आधी समतेने देशाला नटवा

आधी समतेने देशाला नटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।
आधी जातीभेदाला मिटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा । ।। धृ ।।

शंकराचार्याचा गादीवरी ।
तिथ तुमचीच मक्तेदारी ।
बहुजन असो विद्वान ।
कधी बसवली का तिथे नारी ।
स्त्री पुरुष भेद हा मिटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।  ।। 1 ।।

पहा जाऊन पंढरपूरी ।
शिर्डी बालाजी तुळजापूरी ।
म्हणता देवाची लेकर सारी ।
बहुजनांचा हाय का पुजारी ।
आधी भटाला तिथून उठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।।।2।।

ग्राम पंचायत पालिकेत ।
काय चालवलय तुम्ही डोक ।
मोठया हुद्यावर तुमची भरती ।
झाडू माराया आमची लोक ।
झाडू माराया त्यांना पाठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।।3।।

श्रीमंताचा शाळा भारी ।
आमच्या शाळा उघड्यावरी ।
भारताच्या या भूमि वर ।
विषमता सारी ।
राजा शाहूंचे विचार आठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।

   
       जय भिम

Wednesday, 12 April 2017

राज्यसेवा_परिक्षा_२०१६_मुलाखत

#राज्यसेवा_परिक्षा_२०१६_मुलाखत

*नाव- प्रकाश लालासाहेब पोळ*

*M.Sc. Biotech/M.A. Pol. Sci.*

*Panel- व्ही. एन. मोरे सर*

*वेळ- ३५ मि.*

*गुण- ७०*

मी- May I come in Sir ?

मोरे सर- Yes. Come in.

मी- Good morning Sir. Good morning sirs.

मोरे सर- Have a seat.

मी- Thank you sir.

मोरे सर- दहावी कुठून? बारावी कुठून? पदवी कुठून ?

मी- सर माझी दहावी पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल ओंड येथून आणि बारावी दादासाहेब उंडाळकर ज्युनिअर कॉलेज उंडाळे येथून तर पदवी कृष्णा अभिमत विद्यापीठातून झाली आहे.

मोरे सर- M.Sc.  Biotech करून M.A. Pol. Sci. का केले?

मी- सर mpsc चा अभ्यास करताना राज्यशास्त्र विषयात गोडी निर्माण झाली. त्या विषयाचे अधिक ज्ञान मिळवण्यासाठी M.A. राज्यशास्त्र केले.

मोरे सर- external केले कि regular ?

मी- regular केले.

मोरे सर- घरी शेती किती आहे ?

मी- सर आम्हाला शेती नाही.

मोरे सर- वडील काय करतात ?

मी- सर माझे वडील एस. टी. महामंडळामध्ये नोकरी करत होते. २०१३ मध्ये त्याचं निधन झालं.

मोरे सर- मग खर्च कसा भागवता ?

मी- माझा भाऊ नोकरी करतो. तो सर्व खर्च बघतो.

मोरे सर- आवडता विषय कोणता ?

मी- राज्यशास्त्र.

मोरे सर- संघराज्य आणि राज्यांचा संघ म्हणजे काय ? त्यात नेमका काय फरक आहे? भारताच्या बाबतीत काय परिस्थिती आहे ?

मी- सर, जेव्हा एकापेक्षा जास्त राज्ये आपसात करार करून एकत्र येतात, केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ताविभाजन केलेलं असते, दोघांसाठी स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था असते तेव्हा त्याला संघराज्य म्हणतात. उदा. अमेरिका. परंतु काही वेळा पूर्ण संघराज्य निर्माण न करता केंद्र सरकार प्रबळ बनविले जाते आणि मर्यादित प्रमाणात राज्यांना अधिकार वाटप केले जाते. अशा परिस्थितीत आपण संघराज्य हा शब्द न वापरता राज्यांचा संघ हा शब्दप्रयोग वापरला आहे. आपले संघराज्य पूर्ण संघराज्य नसून अर्ध संघराज्य आहे. कारण आपली घटना संघात्मक वैशिष्ठ्ये दाखवते तसेच एकात्मिक वैशिष्ठ्येही दाखवते.

मोरे सर- तुम्ही संघराज्य नसून राज्यांचा संघ म्हणता. तशी स्पष्टता घटनेत आहे का ?

मी- हो सर. राज्यघटना कलम १ मध्ये म्हटलं आहे कि india म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ (union of states) असेल.

मोरे सर- कलम १३ आणि कलम ३६८ काय आहे ? दोन्हीमध्ये काही विसंगती आहे असे वाटते का ?

मी- सर कलम १३ मध्ये सांगितलं आहे कि मुलभूत हक्कांशी विसंगत कायदे रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला राहील. आणि कलम ३६८ संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार देते. संसदेने केलेला कायदा किंवा घटनादुरुस्ती मुलभूत हक्कांशी विसंगत असेल तर तो न्यायालय रद्द करू शकते. त्यामुळे कायदेमंडळाचा एकाधिकार न राहता व्यवस्था संतुलित राहू शकते. आणि नागरिकांच्या मुलभूत हक्कांच्या रक्षणाचीही हमी मिळते. त्यामुळे या दोन कलमात विसंगती नाही.

मोरे सर- कलम ३६८(३) काय आहे?

मी- Sorry sir. मला उपकलम आठवत नाही.

मोरे सर- संसदेचे कायदे रद्द करण्याचा अधिकार न्यायालयांना असावा का?

मी-  हो सर. कोणत्याही परिस्थितीत चुकीचे कायदे तयार होवू नयेत म्हणून संसदेच्या कायद्यांचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार न्यायालयांना असावा.

मोरे सर- मग यामुळे संसदेच्या अधिकारांचे हनन होतंय असं नाही का वाटत ?

मी- नाही सर. संसदेने केलेले योग्य कायदे न्यायालयीन कसोटीवर टिकतील, परंतु अन्याय्य, अतार्किक, मुलभूत हक्कांशी विसंगत कायदे किंवा घटनेच्या basic struchture ला धक्का पोहचवणारे कायदे रद्द होतील. यामुळे संसदेचा कायदे करण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. त्यामुळे संसदेच्या अधिकारांचे हनन होण्याचा प्रश्न नाही.

मोरे सर- Basic structure काय आहे? असं कुठे काही define केलं आहे का ?

मी- सर १९७३ च्या केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या basic structure विषयी भाष्य केले. घटनेची काही तत्वे खास असून त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. Basic structure कुठेही define केलेले नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळीच्या निकालात त्याविषयी सांगितलं आहे.

मोरे सर- लोकांनी निवडून दिलेली संसद सार्वभौम नको का ? कायदे करण्याचा अधिकार कुणाला असावा, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना कि इतर कोणत्या संस्थेला ?

मी- सर ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम आहे तर अमेरिकेमध्ये न्यायालय सार्वभौम आहे. भारताच्या दृष्टीने विचार करता आपण कोणत्याही एका यंत्रणेला सार्वभौम न बनवता दोघांमध्ये संतुलन साधले आहे. आपण कायदे करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीना म्हणजेच संसदेला दिला आहे तर संसदेच्या कायद्यांचे परीक्षण करण्याचा अधिकार न्यायालयांना दिला आहे. संसदेने केलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालय निर्णय देतील अशी अपेक्षा आहे तर संसदेने केलेले अतार्किक कायदे न्यायालयाने रद्द करावेत अशी अपेक्षा आहे. कायदे करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीना म्हणजेच संसदेला असावा.

मोरे सर- कलम ३६८ नुसार घटनादुरुस्ती करता येते. असा अधिकार असावा का ?

मी- हो सर. कोणतीही घटना कायमस्वरूपी असू शकत नाही. काळानुसार राज्यघटनेत सुसंगत बदल केले पाहिजेत. घटना प्रवाही असेल तर आपण योग्य मार्गाने समाजाचा विकास करू शकतो. त्यामुळे घटनादुरुस्तीचा अधिकार असला पाहिजे.

मोरे सर- समजा एखादी घटनादुरुस्ती केली आणि त्यामुळे मुलभूत हक्कांचे हनन झाले तर काय परिस्थिती निर्माण होईल?

मी- एखाद्या घटनादुरुस्तीमुळे जर मुलभूत हक्कांचे हनन झाले तर ती घटनादुरुस्ती रद्द करण्याचा अधिकार कलम १३ नुसार न्यायालयांना आहे. त्या घटनादुरुस्ती कायद्यामुळे जितक्या प्रमाणात मुलभूत हक्कांचे हनन झालेय तितक्या प्रमाणात तो कायदा गैरलागू होईल.

मोरे सर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो. आंबेडकरानी एकट्याने घटना लिहिली का? एकट्या व्यक्तीला घटनेचे श्रेय देणे योग्य आहे का ?

मी- सर घटनानिर्मिती करण्यासाठी २९९ लोकांची घटना समिती होती. यातील महत्वाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. जगातील महत्वाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या घटनेचा कच्चा मसुदा तयार करण्याची अत्यंत महत्वाची आणि अवघड जबाबदारी आंबेडकरानी पार पाडली. घटना समितीतील त्यांची भाषणे, त्यांनी केलेले कार्य, इतर सदस्यांच्या आक्षेपांना दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे खूप महत्वाची आहेत. घटना समितीतील इतर सदस्यांची भाषणे पहिली तरी असं दिसतं कि आंबेडकरानी घटनानिर्मितीच्या कामात खूप मोठे योगदान दिले आहे. समितीतील प्रत्येक सदस्याचे कार्य महत्वाचे आहेच. ते नाकारता येणार नाही. परंतु सर्व सदस्यांनीच आंबेडकराना घटनेचे सर्वात जास्त श्रेय दिले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकराना घटनेचे शिल्पकार म्हणण्यात काहीही वावगे नाही.

मोरे सर- सशस्त्र दलांच्या मुलभूत हक्कांवर निर्बंध लादले जातात. हे योग्य आहे का?

मी- सर राज्यघटना कलम ३३ नुसार सशस्त्र दलांच्या मुलभूत हक्कांवर निर्बंध लादणारे कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. सशस्त्र दलांचे कार्य आणि भूमिका अतिशय संवेदनशील असते. त्याचा देशाच्या सुरक्षेवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे त्या दलांचे कामकाज व्यवस्थित चालावे जेणेकरून देशाची सुरक्षितता अबाधित राहील यासाठी त्यांच्या मुलभूत हक्कांवर काही प्रमाणात निर्बंध लावणे योग्य होईल.

मोरे सर- प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांवरही खूप बंधने असतात. TV खरेदी केला, जमीन खरेदी केली तरी सरकारला कळवावं लागतं. याची गरज आहे का?

मी- प्रशासनातील लोक आपल्या पगाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही मोहाला बळी पडू नयेत यासाठी असे निर्बंध काही प्रमाणात योग्य ठरतील. कारण यामुळे त्या व्यक्तींवर सतत सकारात्मक दबाव राहील आणि त्यामुळे ते भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना त्यांच्या सर्व संपत्तीचा हिशोब सरकारला द्यावा लागेल.

मोरे सर- प्रशासनातील लोक चौकशीला तयार आहेत. कर भरताहेत. सर्व बँक डीटेल्स सरकारकडे आहेत. मग अशा इतर निर्बंधांची गरजच काय?

मी- सर मला वाटतं भ्रष्टाचार आणि लाचखोरीपासून कर्मचार्याना दूर ठेवण्यासाठी असे निर्बंध असावेत. प्रामाणिक लोकांना यामुळे काही त्रास होणार नाही. मात्र भ्रष्ट लोकांची बेहिशोबी संपत्ती आणि भ्रष्टाचार समोर येऊ शकतो.

Member 1- सध्या तामिळनाडूमध्ये जलिकट्टूबद्दल आंदोलने चालू आहेत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे. आणि आता राष्ट्रपती आणि राज्यपाल परवानगी देण्यासाठी अध्यादेश काढत आहेत. हे योग्य आहे का? याचा राज्याशास्त्रीय पैलू सांगा.

मी- सर जलिकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या खेळात अनेक व्यक्तींचा जीव गेला आहे. बैलांचाही छळ होतो. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाची बंदी मला योग्य वाटते. न्यायालयाने सर्व परिस्थितीचा विचार करूनच निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचा आपण आद करायला हवा. न्यायालयाचा निर्णय बदलण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा अधिकार कार्यकारी आणि कायदेमंडळाला जरूर आहे. परंतु चुकीच्या गोष्टीसाठी हा अधिकार वापरला तर त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांवर होतील. त्यामुळे राष्ट्रपतींनी आणि राज्यपालांनी याबाबत असा अध्यादेश काढणे चुकीचे होईल असे मला वाटते.

Member 1- मग लोकांच्या प्रथा-परंपरांचा आदर न्यायालयाने नको का करायला ?

मी- सर योग्य प्रथा-परंपरांचा आदर जरूर केला पाहिजे. परंतु अनिष्ठ, कालबाह्य प्रथा-परंपरांवर बंदी घातलेलीच योग्य राहील.

Member 1- खरंय तुमचं. उद्या कोणी उठेल आणि म्हणेल हुंडा आमची परंपरा आहे, सतीप्रथा आमची प्रथा आहे. मग द्यायची का आपण परवानगी ?

मी- नाही सर.

Member 1- लोकांच्या भावना तीव्र झाल्याने दहशतवाद निर्माण होतो हे तुम्हाला पटतं का ?

मी- हो सर. लोकांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेक घटनात्मक मार्ग आहेत. परंतु भावना तीव्र झाल्या तर लोक लोकशाही घटनात्मक मार्ग सोडून घटनाबाह्य मार्ग स्वीकारण्याची शक्यता वाढते. हिंसाचारही निर्माण होवू शकतो. अशा परिस्थितीत काही वेळा त्याचे पर्यवसान दहशतवादात होवू शकते.

Member 1- चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद अशा दहशतवादाच्या दोन संकल्पना पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानच्या या संकल्पना काय आहेत हे आधी सांगा आणि दहशतवाद चांगला आणि वाईट अशी विभागणी होवू शकते का याबद्दल तुमचं मत सांगा.

मी- सर जेव्हा पाकिस्तानात दहशतवादी कारवाया होतात तेव्हा पाकिस्तानला तो वाईट दहशवाद वाटतो. परंतु इतर देशात उदा. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया झाल्या तर तो तिथल्या आझादिसाठीचा संघर्ष असून तो चांगला दहशतवाद आहे असं पाकिस्तानला वाटतं. दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत वाईटच असतो. त्याची चांगला आणि वाईट अशी विभागणी होवू शकत नाही.

Member 2- सध्या पुतीन आणि ट्रम्प चर्चेत आहेत. मी काल एका वर्तमानपत्रात वाचले कि येत्या काळात ट्रम्प यांना मागे टाकून पुतीन जगाचं नेतृत्व करतील. ट्रम्प यांच्यापेक्षा पुतीन हे वरचढ होतील असं बोललं जातं. तुम्हाला हे पटतं का?

मी- सर रशियाचे अध्यक्ष पुतीन हे खूप खंबीर व्यक्तिमत्व आहे. प्रशासनावर आणि एकंदरच जागतिक राजकारणावर त्यांची बर्यापैकी हुकुमत आहे. युक्रेन आणि सिरीया प्रश्नानंतर ज्या पद्धातीने पुतीन यांनी जागतिक दबावाला तोंड दिले ते पाहता त्यांचा नेतृत्व गुण आणि स्वाभिमानी बाणा दिसून आला. त्यामुळे पुतीन हे ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ होतील असं मला वाटतं.

Member 2- प्रशासनात Terror on work ही एक संकल्पना आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

मी- Sorry sir. मी याबद्दल कधी ऐकले नाही.

Member 2- प्रशासनात काम करताना सतत कुणाचतरी दडपण किंवा दहशत असावी अशी एक संकल्पना आहे. असावं का असं दडपण ?

मी- सर प्रशासनात काम करताना सकारात्मक दबाव जरूर असावा. मी जर काही चुकीचं काम केलं तर कायद्याच्या दृष्टीकोनातून ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे कायद्याची आणि काही प्रमाणात वरिष्ठांचा सकारात्मक दबाव असावा. मात्र नकारात्मक दबाव असू नये असं मला वाटते. कारण त्यामुळे प्रशासकीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. (हाच प्रश्न मोरे सरांनीही पुन्हा विचारला.)

मोरे सर- Nanotechnology चे applications सांगा.

मी- सर Nanotechnology रेणू स्तरावर काम करते. अतिशय सूक्ष्म पातळीवर काम करत असल्याने बहुतेक क्षेत्रात याचा फायदा होणार आहे. उदा. मोठ्या संगणकाची जागा अतिशय छोटा संगणक घेईल जो हाताळायला सुलभ असेल. ठराविक आजारावर उपचार ठरणारे naobots तयार करता येतील, जे थेट infected पेशींना टार्गेट करतील.

मोरे सर- तुम्ही blood donation camp organise करता. किती केले आत्तापर्यंत?

मी- सर चार camp केले.

मोरे सर- Blood चे component सांगा.

मी- सर RBC, WBC आणि platlates.

मोरे सर- त्यांचा life span किती?

मी- RBC- १२० दिवस, WBC-४-५ दिवस platelates १० दिवस असा त्यांचा life span आहे.

मोरे सर- Donate केल्यानंतर blood component separate केले जातात का?

मी- हो सर. Blood donate केल्यानंतर component separate केले जातात.

मोरे सर- Platelates चा role काय?

मी- रक्त गोठवण्यासाठी platelates चा उपयोग होतो.

मोरे सर- अजून काय role आहे?

मी- Sorry sir, मला माहित नाही.

मोरे सर- (इतर दोन सदस्यांकडे पाहत) ठीक आहे. तुम्ही येऊ शकता.

Friday, 7 April 2017

आम्रपाली

ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या बिरुदाने विख्यात असलेल्या 'आम्रपाली'ची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शकली नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची आपण होऊन निवड केलेली नव्हती, वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला सर्वांची पत्नी बनवून संपूर्ण नगराकडे सोपवण्यात आले होते.
आम्रपालीचे जन्मदाते इतिहासाला ज्ञात नाहीत. परंतु वैशाली नगरातील ज्या लोकांनी तिचे पालनपोषण केले त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली ठेवण्यात आले होते. ती दिसायला खूप सुंदर होती, तिचा चेहरा तेजस्वी होता, काया अत्यंत आर्कषक होती आणि तिचा देह कमनीय होता. जो कोणी तिला पहायचा त्याची दृष्टी तिच्यावर खिळून राहत होती. परंतु हेच सौंदर्य, आकर्षण तिच्यासाठी शाप ठरले. एका सामान्य मुलीप्रमाणे तिला तिचे आयुष्य जगता आले नाही. ती तिचे दुःख कोणासमोरही मांडू शकली नाही आणि शेवटी नियतीच्या मनात जे होते तेच घडले. (repost)

आम्रपाली जसजशी मोठी होत गेली तिचे सौंदर्य आणखी वृद्धिंगत होत गेले. वैशालीमधील प्रत्येक पुरुष तिला स्वतःच्या पत्नी रुपात पाहत होता. लोकांमध्ये आम्रपालीला हस्तगत करण्यासाठी एवढी चुरस निर्माण झाली होती की, कोणी कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. हीच सर्वात मोठी समस्या होती. आम्रपालीच्या पालनकर्त्या मायबापास या गोष्टीची जाणीव होती की, आम्रपालीचे लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो सर्वांसाठी शत्रू ठरेल आणि वैशालीमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. या परिस्थितीमुळे ते कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचू शकत नव्हते. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी एके दिवशी वैशालीत सभा भरवण्यात आली. या सभेमध्ये उपस्थित सर्व पुरुष आम्रपालीशी लग्न करण्याच इच्छुक होते. यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे विचार मांडण्यात आले परंतु कोणताही योग्य मार्ग निघू शकला नाही.

परंतु शेवटी जो निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आम्रपालीचे आयुष्य नरकात लोटले गेले. सर्वांच्या संमतीने आम्रपालीला नगरवधू म्हणजे वेश्या घोषित करण्यात आले. असे करण्यामागचे कारण असे होते की, सर्वांना वैशालीचे गणतंत्र सुरक्षित ठेवण्याची इच्छा होती. आम्रपालीला एका व्यक्तीला सोपवले असते तर यामुळे एकता खंडित झाली असती. नगरवधू झाल्यानंतर प्रत्येकजण तिला मिळवण्यासाठी स्वतंत्र होता. अशाप्रकारे राज्याच्या निर्णयाने तिला वेश्या बनवले. आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले...

अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे. तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतुहल आवरता आले नाही. त्याने थेट वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महालात पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युध्द समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने खरोखरीच आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युध्द संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली. ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले. पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने नंतरच्या काळात वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला होता.

या दरम्यानच्या काळात भगवान बुद्ध मार्गक्रमण करत-करत वैशालीत आले. त्यांच्यासोबत शेकडो शिष्य होते. सर्व शिष्य दररोज वैशालीमध्ये जाऊन भिक्षा मागत होते. वैशालीमध्येच आम्रपालीचा महाल होता. एकदा आम्रपालीने रस्त्यातून तेजस्वी, देखण्या बौध्द भिख्खुला इतर भिख्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बर्‍याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिख्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. तिने त्या भिख्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. दुसऱ्याच दिवशी तिच्या दरवाजावर त्या जथ्थ्यातील एक भिख्खु भिक्षा मागण्यासाठी आला. त्याला पाहताच आम्रपाली त्याच्या प्रेमात पडली. ती दररोज राजकुमार, धनवान लोकांना पाहत होती, परंतु भिक्षापात्र हातामध्ये घेतलेल्या भिख्खुमध्ये तिला अपर प्रेम आणि सौंदर्य दिसून आले. तिने भिख्खुला विनंती केली - 'कृपया, घरात येऊन माझे दान ग्रहण करा.'

त्या भिख्खुमागे इतरही अनेक भिख्खुक होते. त्या सर्वांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो तरुण भिख्खु आम्रपालीच्या महालात भिक्षा घेण्यासाठी गेल्यानंतर त्याचे सर्व सहकारीगण ईर्ष्या आणि क्रोधाने लाल झाले होते. भिक्षा दिल्यानंतर आम्रपाली त्या भिख्खुला म्हणाली की - 'तीन दिवसानंतर पावसाळा सुरु होत आहे. हे चार महिने तुम्ही माझ्याकडे वास्तव्य करावे अशी माझी इच्छा आहे.'
युवक भिख्खु म्हणाला - 'मला यासाठी माझ्या गुरूंकडून परवानगी घ्यावी लागेल. जर त्यांनी मला येथे राहण्याची परवानगी दिली तरच मी राहण्यासाठी येईल.'

तो आम्रपालीच्या महालातून बाहेर पडताच इतर शिष्यांनी त्याला महालात काय घडले हे विचारले. त्याने आम्रपालीने व्यक्त केलेली इच्छा सर्वांना सांगितली. हे ऐकून सर्व भिख्खुंना खूप राग आला.आम्रपालीला एक दिवसच पाहून ते तिच्यावर घायाळ झाले होते आणि याने थेट चार महिन्यांची तयारी केली होती. युवक भिख्खु बुद्धांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच इतर भिख्खु त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सर्व घटना तिखट मीठ लावून सांगितली. ती एक वेश्या असून चार महिने तिच्याकडे एक भिख्खु कसा काय राहू शकतो असा प्रश्न त्यांनी भगवान बुद्धांसमोर उपस्थित केला ?
भगवान बुद्ध म्हणाले - ' शांत व्हा, आधी त्याला माझ्याकडे येऊ द्या. त्याने तेथे थांबण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही, मी परवानगी दिल्यानंतरच तो तेथे जाणार आहे.'
युवक भिक्षु तेथे आला आणि त्याने बुद्धांचे चरण स्पर्श करून सर्व घटना सांगितली. 'आम्रपाली वैशालीची नगरवधू असून चार महिने मी तिच्या महालात राहण्याची विनंती तिने केली आहे. सर्व भिख्खु कोणाच्या न कोणाच्या घरी राहणार आहेत. तुमची परवानगी मिळाली तरच तेथे येईन असे मी तिला सांगितले आहे.
भगवान बुद्धांनी त्याच्या डोळ्यात पहिले आणि म्हणाले - ''तू चार महिने तिथे राहण्यासाठी जाऊ शकतोस.

बुद्धांचे शब्द ऐकून सर्व भिख्खुंना आश्चर्याचा धक्का बसला. तीन दिवसानंतर तो भिख्खु आम्रपालीच्या महालात राहण्यासाठी गेला. त्या नंतर काही दिवसांनी  नगरात चालू असलेल्या चर्चा इतर भिख्खुगणांनी भगवान बुद्धांच्या कानी घालण्यास सुरुवात केली. भगवान बुद्ध त्यांना म्हणाले - 'तुम्ही तुमच्या दिनचर्येचे पालन करत राहा. मला माझ्या शिष्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या मनामध्ये कोणतीची इच्छा नसल्याचे मला त्याच्या डोळ्यामध्ये दिसले आहे. मी त्याला परवानगी दिली नसती तरी त्याला वाईट वाटले नसते. मी त्याला परवानगी दिली आणि त्यानंतर तो गेला आहे. मला त्याच्या ध्यान आणि संयामावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एवढे चिंताग्रस्त का झाला आहात? तो त्याच्या संयमावर अटळ असेल तर आम्रपालीसुद्धा त्याच्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. ही त्याच्या परीक्षेची वेळ आहे. फक्त चार महिने वाट पाहा, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्या परीक्षेत उत्तीर्ण होईल.

चार महिन्यानंतर तो युवक भिख्खु आश्रमात परत आला आणि त्याच्या मागमागे आम्रपाली देखील भगवान बुद्धांकडे आली. आम्रपालीने बुद्धांकडे भिख्खुणी होण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली - 'तुमच्या भिख्खुला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मी सर्व प्रयत्न केले परंतु मला यश आले नाही. त्याचा आचरणाने माझे मन बदलले असून तुमच्या चरणातच सत्य आणि मुक्तीचा मार्ग असल्याचा मला साक्षात्कार झाला आहे. त्याच्या आत्मभानाने, मनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. परिणामवश आपल्या सौंदर्याविषयाचे गर्वहरण झाले आहे. आता वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली आहे"

अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुध्दाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुध्दांनीही ते आमंत्रण स्वीकारले. इतिहासात असे दाखले आहेत की, यावेळी वैशालीचा राजा असणाऱ्या अजातशत्रूने बुद्धांनी आम्रपालीचे आमंत्रण स्वीकारू नये असा हुकुम दिला होता पण राजाज्ञेच्या विरुद्ध जाऊन महात्मा बुद्ध तिच्या घरी गेले. अजातशत्रूने जेंव्हा वैशालीवर हल्ला चढवला होता तेंव्हा त्याने संपूर्ण नगर बेचिराख करून निर्मनुष्य करण्याचा जणू चंगच बांधला होता पण त्याच्या सैनिकांना आम्रपालीस कारागृहाकडे नेताना तिचे असीम सौंदर्य पाहून त्याचे विचार गोठले. नेमका याचाच फायदा घेऊन आम्रपालीने वैशालीला पुन्हा एकदा जीवदान दिले होते. गौतमांनी हे ताडले होते की अजातशत्रू हा वैशालीसाठी विनाशक राजा आहे मात्र आम्रपाली ही जीवनदायिनी आहे, त्यामुळे अजातशत्रूच्या आदेशाला डावलून त्यांनी आम्रपालीचे आमंत्रण स्वीकारून एक प्रकारे तिला अजातशत्रूहून श्रेष्ठ ठरवले. बुद्ध आम्रपालीच्या महाली आल्यानंतर तिने राजगणिकेच्या आपल्या पदाचा त्याग केला व बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला. तिने तिची सर्व संपत्ती बौद्ध भिख्खुंना दान केली आणि त्यांनी ती जनतेत वाटून टाकली.
बौध्द धर्मात आम्रपालीच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. पुढें वयात आल्यावर विमल कौंडिण्यही बौध्द भिख्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुध्द राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुध्दांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुध्दांनी प्रसिध्द अंबपालिका सूक्त सांगितले.
आम्रपालीचा महाल चातुर्मासमध्ये सर्व भिक्षूंचे निवासस्थान बनले आणि पुढील कालखंडात बुद्धांच्या संघात सर्वात प्रतिष्ठित भिख्खुणी म्हणून आम्रपालीचे नाव अजरामर झाले.

एक अनोखे आयुष्य जगणारी, सर्व भोगविलास भोगून झाल्यावर जेव्हा आत्मभान येऊ लागले तेव्हा तो प्रवासही धैर्यपूर्वक करणारी, सर्व ऐहिक सुखांचा, लौकिकाचा, प्रतिष्ठेचा परित्याग करून खडतर वाट पत्करणारी, ज्ञान व भक्तीच्या मार्गात लीन होऊन साक्षात्कारापर्यंत पोहोचलेली, अरहंतपद प्राप्त केलेली महानिश्चयी स्त्री! तिचा हा जीवनप्रवास नक्कीच वेगळा व स्फूर्तीदायी आहे. आम्रपालीने सौदर्याची असामान्य शिक्षा भोगली मात्र त्यातून प्राप्त झालेल्या सहवासाच्या जोरावरच तिने भिख्खुणीपर्यंतची पायरी गाठली हा तिच्या आयुष्यातील परमबिंदू म्हणावा लागेल.

आजही काही लोक तिच्या पूर्वाश्रमातील वेश्या असण्याचं भांडवल करून तिच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करतात पण त्यांना याचा विसर पडतो की तिच्यामुळेच दोन वेळा वैशाली बेचिराख होता होता वाचलं. तिच्या देहाचे लचके तोडण्यास आतुर झालेल्या एकाही पुरुषाला जे जमले नाही ते तिने करून दाखवले. त्यामुळे आम्रपाली आणखी उदात्त आणि उत्तुंग वाटत राहते. फक्त एका गोष्टीची खंत वाटते की, अशी संधी आणि असे परिवर्तन कुठल्याच वेश्येच्या वाट्यास आले नाही. अशी संधी पुन्हा कुठल्याही वेश्येच्या नशिबी न येणं ही स्त्री जन्माची एक शोकांतिकाच आहे असे मी मानतो. खरं तर तिला वेश्या असं संबोधन करणं हेच मुळात सकल पुरूषांसाठी पुरुषी वर्चस्ववृत्ती व अधाशी भोगकारतेचं अघोरी लक्षण आहे. त्यामुळे तिचा उल्लेख जेंव्हा जेंव्हा वेश्या असा होईल तेंव्हा तेंव्हा पुरुषी भोगविलासी शोषक वृत्तीस ती मोठी थप्पड असणार आहे....      

- समीर गायकवाड.

(अजिंठ्याच्या चित्रगुंफातील आम्रपालीच्या मूळ चित्रासह तिची काही देखणी तैलचित्रे पाहण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगपेजला भेट द्या...
https://sameerbapu.blogspot.in/2015/08/blog-post_29.html)
   
https://sameerbapu.blogspot.in/2015/08/blog-post_29.html
(लेखासाठीचे संदर्भ - 'द लिजेंड ऑफ आम्रपाली' - लेखक अनुराग आनंद
'द ग्रेट झेन मास्टर ता हुयी' - लेखक ओशो रजनीश)