काल राती राजा अघटित झालं।
महापुरुषांनी साऱ्या आंदोलन केलं।
त्यांचा मोर्चा अचानक आला माह्या दारावर।
भगतसिंगानं बंदुक ठेवली माह्या कानावर।।
आमचे पुतळे उभारणं आता बंद करा म्हणे।
आमचे विचार निदान पुढच्या पीढित पेरा म्हणे।।
शिवबांनी जगदंबा तलवार, दिली माहया हातात।
फाड म्हणे विशिष्ट रंगाचे कपडे, आम्हाला गुंढाळलं ज्याच्यात।।
म्हणे त्या विशिष्ट रंगात श्वास आमचा कोंडतो।
जेव्हा जाती-धर्माच्या नावाखाली माणूस माणसात भांडतो।।
रागारागातच मग सावित्रीबाईंनी दिली दस्तक।
हिस्कावला माह्या अँड्रॉइड अन् दिलं इतिहासाचं पुस्तक।।
माह्या लेकिलेबि आता पाठव म्हणे शाळत।
नाहीतर तुही अब्रु म्हणे वेशिवर ठेविल वाळत।।
बाबासाहेबांनाही भलताच आला होता राग।
म्हणे याच साठी केला कारे आम्ही सर्वस्वाचा त्याग।।
विज्ञानाचं युग थोड़ी ज्ञानाची कास धरा।
अन् घोषणा नको तर घटना वाचून माह नाव मोठं करा।।
द्वेषनिद्रेतून जगाला साऱ्या कर म्हणे जागं।
तरच राजा आमचं आंदोलन आम्ही घेऊ मागं।।
No comments:
Post a Comment